मालमत्ता कर थकबाकीदाराच्या स्थावर मालमत्तांची  मालमत्ता कर विभागाव्दारा विक्री

0
11

नागपूर, ता. ३१ : वर्षोनुवर्षे मालमत्ता कर न भरणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध आता नागपूर महानगरपालिकेने कंबर कसली आहे. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकानुसार उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मनपाच्या कर विभागाच्या माध्यमातून थकबाकीदारांच्या स्थावर व जंगम मालमत्ता जप्ती व अटकावणी करून लिलाव प्रक्रिया राबविण्यात येत आहे. लिलावाच्या माध्यमातून विक्रीची सक्तीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

या कार्यवाही अंतर्गत हनुमाननगर झोन क्र. ३ च्या कार्यक्षेत्रातील युनिक को-ऑपरेटिव्ह सोसायटी, नरेन्द्र नगर, विकास सोसायटी, नरेन्द्र नगर व विश्वजीत को-ऑपरेटिव्ह सोसायटी येथील सहा भूखंडाची, धरमपेठ झोन कार्यक्षेत्रातील महादेव नगर, जी.एन.एस.एम गव्हर्नमेंट प्रेस एम्प्लॉईज सोसायटी, बंधू गृहनिर्माण व हिल व्ह्यू को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील सहा भूखंडाची विक्री करून व लक्ष्मीनगर झोनच्या कार्यक्षेत्रातील श्रीमती वृंदा दाऊ यांच्या बंगल्याची विक्री करून मालमत्ता कराची थकीत रक्कम वसूल करण्यात आली आहे.

नागपूर महानगरपालिका हद्दीत असलेले खुले भूखंड व बंद स्थितीत असलेल्या मालमत्ताधारकांनी संबंधित झोन कार्यालयाशी संपर्क साधून मालमत्ता कराची मागणी देयके प्राप्त करून घ्यावीत व प्रदेय रक्कम नागपूर महानगरपालिका निधीत ३१ डिसेंबर २०२१ पूर्वी जमा करावी. थकीत मालमत्ता कर मनपा निधीत लवकरात लवकर जमा करून सक्तीची कार्यवाही टाळावी असे आवाहन मनपाचे उपायुक्त (महसूल) यांनी केले आहे. चालू आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर ३१ डिसेंबर २०२१ पूर्वी भरणा केल्यास मालमत्ता करातून शासनाचे कर वगळून शिल्लक रक्कमेवर पाच टक्के सूट मिळवा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here