नागपूर, ता. ७ – कोरोनाची लाट उसळल्यानंतर नागपुर शहरात पहिल्यांदा आज कोरोनाचा एकही पॉझीटिव्ह रुग्ण आढळला नाही. नागरिकांनी यामुळे हुरळून न जाता अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.
नागपुरात मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर कोरोनाच्या पहिल्या लाटेत तसेच दुसऱ्या लाटेत नागपूर शहरात दररोज कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते. ६ आँगस्टला रात्री १२ वाजेपर्यंत झालेल्या कोरोनाच्या चाचणीत एकही रुग्ण आढळून आला नाही. नागपूर शहरात ४८५६ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी एकही रुग्ण कोरोना पॉझीटिव्ह आढळला नाही. तसेच एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही. नागपुर जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ९२ हजार ९२५ कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत १०११७ रुग्णांचा मृत्यू झाले आहेत. परंतु आज मात्र एकही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.
नागपुर शहरात आज एकही कोरोना रुग्ण प़ॉझीटिव्ह आढळला नाही, ही नागपूरसाठी चांगली बातमी आहे. यासाठी डॉक्टर व आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांनी चांगले काम केले आहे. त्याप्रमाणे महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या कर्मचार्यांनी चांगले काम केले आहे. परंतु कोरोनाचे संकट टळलेले नाही. तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क व सुरक्षित राखण्याची आवश्यकता आहे. येणारा काळ हा सणासुदीचा आहे. त्यामुळे प्रार्थना स्थळांमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. ही गर्दी टाळली पाहिजे, असे आवाहन डॉ. राऊत यांनी केले आहे.
नागपूर ग्रामीण भागात आज केवळ एक कोरोनाचा पॉझीटिव्ह रुग्ण आढळला आहे. ग्रामीण भागात सुद्धा पॉझीटिव्ह आढळू नये, यासाठी आरोग्य विभागाला निर्देश दिले आहेत. ग्रामीण भागात आज ५२५ रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात केवळ एक रुग्ण कोरोना पॉझीटिव्ह आढळून आला आहे.





