करोनाचे निर्बंध आणि आडकाठी फक्त महाराष्ट्रातच का? इतर राज्यात सगळं सुरळीत सुरू आहे. तिसरी लाट येणार म्हणून आपण आतापासूनच घाबरून बसायचं ह्याला काय अर्थ आहे? लोकांचे हाल कधी बघणार?,’ असा संतप्त सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्य सरकारला केला. ‘दुष्काळ आवडे सर्वांना तसं लॉकडाउन आवडे सरकारला’ अशी सध्याची परिस्थिती आहे,’ असा बोचरा टोलाही राज ठाकरे यांनी हाणला.
‘आता रेल्वे सुरू करण्याचा विचार राज्य सरकार करतं असं आम्ही ऐकतोय. पण लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, असं मी आधीच सांगितलं होतं. लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. उद्योगधंदे बुडाले आहेत. घरं कशी चालवायची कळत नाही? मुलांच्या फीया कशा भरायच्या हा प्रश्न आहे. सरकारला लॉकडाउन करायला काय जातंय? भोगावं सामान्य माणसाला लागतंय. पण ह्यांना कोणी प्रश्न विचारायचं नाही असं एकंदर चित्र आहे,’ असं राज ठाकरे म्हणाले.






