नागपूर :पार्कींग व्यवस्थापनाबाबत नगरसेवकांनी मांडल्या सूचना

0
14

यूएमटीसी चे दहाही झोनमध्ये सादरीकरण

नागपूर, ता.१६ : शहरातील पार्कींग व्यवस्थापनाच्या संदर्भात मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर मनपाद्वारे हैदराबाद येथील अर्बन मास ट्रांजिट कंपनीला (यू.एम.टी.सी.) पार्कींग मॅनेजमेंट अँड स्ट्रीट पार्कींगचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसार कंपनीद्वारे तयार आराखड्याचे सभागृहाने दिलेल्या निर्देशानुसार दहाही झोनमध्ये १२ ते १५ जुलैदरम्यान सादरीकरण करण्यात आले. या झोननिहाय सादरीकरणादरम्यान नगरसेवकांनी आपापल्या परिसरानुसार सूचना मांडल्या.

लक्ष्मीनगर झोनमधील सादरीकरणामध्ये ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी अभ्यासाकरिता सादरीकरणाची प्रत मागविली तर माजी महापौर नंदा जिचकार यांनी आपले शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करित असून शहरात स्मार्ट सिटी आणि अत्याधुनिक पार्कींगची व्यवस्था असणे गरजेचे असल्याचे नमूद केले. धरमपेठ झोनमध्ये ज्येष्ठ नगरसेवक संजय बंगाले, नगरसेविका रूपा राय, परिणीता फुके यांनी रामदासपेठ येथील सेंट्रल मॉल, ट्राफिक पार्क यासह आतील रस्त्यांवरील पार्किंगच्या समस्या मांडल्या. हनुमान नगर झोन अंतर्गत सोमवार बाजार सक्करदरा, मेडिकल चौक, मानेवाडा रोड या भागातील वाहतुकीच्या व पार्कींगच्या समस्यांवर उपाययोजना करण्याच्या सूचना झोन सभापती कल्पना कुंभलकर, नगरसेवक अभय गोटेकर, नगरसेविका स्वाती आखतकर, विद्या मडावी यांनी दिल्या. धंतोली झोनमधील सादरीकरणा दरम्यान झोन सभापती वंदना भगत, जलप्रदाय समिती सभापती संदीप गवई, नगरसेविका विशाखा बांते, नगरसेवक मनोज गावंडे यांनी धंतोली झोन अंतर्गत पार्कींगच्या समस्या मांडल्या. नेहरुनगर झोनमध्ये माजी स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी नागपुरात इमारतींच्या बाहेर पार्क केल्या जाणा-या वाहनांची अवस्था लक्षात घेता सूचना मांडली. अहमदाबाद महानगरपालिकेच्या पॅटर्ननुसार सर्व वाहन खरेदीवर काही प्रमाणात पथकर लावण्याची योग्यता तपासण्याची त्यांनी सूचना केली. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी पार्कींगसह हॉकर्स व्यवस्थापनाकडे सुद्धा लक्ष देण्याची सूचना केली.

गांधीबाग झोन अंतर्गत महाल, गांधीबाग, इतवारी भागातील वाहतुकीच्या कोंडीचा विचार करून उपाययोजना करण्याचे झोन सभापती श्रद्धा पाठक यांनी सुचविले. सतरंजीपुरा झोनमध्ये ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांनी दाट वस्तीतील भागामध्ये पार्कींग व्यवस्थापनाचा विचार करण्यात आला अथवा नाही, याची विचारणा केली. पार्कींग व्यवस्थापनाची दाटीवाटीच्या व्यापारी क्षेत्रात नितांत गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. लकडगंज झोनमधील सादरीकरणादरम्यान ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी लकडगंज, स्मॉल फॅक्ट्री एरिया, रेल्वे मालधक्का, पारडी नाका, कळमना परिसरात मोठ्या प्रमाणात मालवाहतूक होते. येथील बरेचशे ट्रक हे लकडगंज, दालमिल, टिंबर मार्केट, लोहा मार्केट या परिसरामध्ये पार्क केले जात असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून यासंदर्भात कडक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. मोठे ट्रक, जड वाहनांना शहरात, वस्तीत थेट प्रवेश नसावा, ट्रक टर्मिनल, ट्रान्सपोर्ट प्लाझा याचा वापर केला जावा, याबाबत उपाययोजना असावी, असे सांगतानाच आयनॉक्स इमारतीजवळ ऑन स्ट्रीट पार्कींग करता येउ शकेल, अशी सूचनाही नरेंद्र बोरकर यांनी केली. लकडगंज झोन सभापती मनीषा अतकरे यांनी ऑन स्ट्रीट पार्कींग करिता ऑपरेटर निवडताना महिला बचत गट किंवा महिला वर्गाकडे याचे काम देण्याची सूचना केली. यामुळे गरजू महिलांना रोजगार उपलब्ध होउ शकेल, असेही त्या म्हणाल्या.

जरीपटका बाराखोली परिसराच्या जागेमध्ये पार्कींगची व्यवस्था शक्य असून कामगार नगर ते बाबा बालक चौक ते पुढे रिंग रोड पर्यंत, लाल गोदाम येथील परिवहन अधिकारी कार्यालय जवळील रोड, कमाल टॉकीज चौक ते वैशाली नगर रोड, इंदोरा ते जरीपटका सीमंट रोड, बाराखोली ते भीम चौक जरीपटका मार्केट येथे ऑन स्ट्रीट पार्कींगची व्यवस्था करता येईल यासह कमाल टॉकीज चौकाजवळील मनपाच्या जागेमध्ये वाहनतळाची परिसरातील व्यापारपेठेकरिता व्यवस्था केल्यास कमाल चौक ते इंदोरा चौक पर्यंत वाहतुकीची कोंडी सुटू शकेल आदी सूचना आशीनगर झोन सभापती वंदना चांदेकर यांच्यासह नगरसेवक सर्वश्री मनोज सांगोळे, मोहम्मद जमाल, दिनेश यादव, नगरसेविका मंगला लांजेवार, विरंका भिवगडे, भावना लोणारे यांनी केल्या.

मंगळवारी झोनमध्ये माजी स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी यावेळी काही मुद्दे मांडले. त्यानुसार विकास आराखड्यामध्ये पार्कींगासाठी आरक्षित जागेच्या विकासाची बाब प्रस्तावात असावी, मेकॅनिकल पार्कींग प्लॉझाचा अंतर्भाव करणे, लहान रस्त्यांवर होणारे अवैध पार्कींग उत्पन्नाचे स्त्रोत होउ शकते का याबाबत विचार करणे आदी बाबींचा अभ्यास होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कर आकारणी व कर संकलन समिती सभापती महेंद्र धनविजय यांनी लिबर्टी टॉकीज ते माउंट रोड सदर हा रस्ता एकमार्गी करून एका भागाला ऑन स्ट्रीट पार्कींक करणे तसेच अशोका हॉटेल ते मेश्राम चौक येथील पार्कींग समस्यांचा विचार करण्याची सूचना केली.

नागपूर शहरातील वाहतूक कोंडी लक्षात घेता आणि या संदर्भात मा. उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेचा विचार करता २०१८ मध्ये नागपूर महानगरपालिकेद्वारे अर्बन मास ट्रांजिट कंपनीला (यू.एम.टी.सी.) पार्कींग व्यवस्थापन आणि ऑन स्ट्रीट पार्कींग आराखडा तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानंतर कंपनीने शहरात सर्वेक्षणाचे कार्य पूर्ण करून आराखडा तयार केला व प्रशासनाने मान्यतेसाठी तो मनपा सभागृहापुढे सादर केला. सभागृहाने कंपनीचे सादरीकरण मनपाच्या सर्व दहाही झोमध्ये करुन सहमतीनुसार पुन्हा एकत्रित प्रस्ताव मनपा सभागृहापुढे सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार कंपनीने दहाही झोनमध्ये सादरीकरण पूर्ण केले. यू.एम.टी.सी चे सहायक व्यवस्थापक अमित भंडारी व वरीष्ठ अभियंता उदय जैस्वाल यांनी सर्व झोनमध्ये सादरीकरण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here