महाराष्ट्र दिनांक 8 जून ( प्रतिनिधी)
राज्यातील विधान परिषदेसाठी २० जून रोजी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने ५ उमेदवारांची यादी आज (दि.८) जाहीर केली आहे. या यादीत भाजपच्या घटक पक्षांतील नेत्यांना डावलण्यात आले आहे.
तर पक्षाच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांना वगळून उमा खापरे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर, राम शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे
राज्यात विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या 20 जून रोजी निवडणूक होणार आहे. 2 जूनला अधिसूचना जाहीर झाली आहे. त्यानंतर 9 जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, काँग्रेसचा एक आणि दहाव्या जागेसाठी पुन्हा भाजप आणि मविआमध्ये चुरस रंगणार आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, आज पक्षाच्या केंद्रीय कार्यालयाने पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. हे पाचही उमेदवार आजच अर्ज दाखल करणार आहेत.
पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते, असेही पाटील यांनी सांगितले. विधान परिषदेसाठी आम्ही पाचवी जागा जिंकून आणणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला






