नागपूर दिनांक 2 जून ( शहर प्रतिनिधी)
नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाद्वारे इलेक्ट्रिक बसचा पुरवठा करणाऱ्या हरियाणाच्या पी.एम.आय. कंपनीला १४५ इलेक्ट्रिक बसच्या पूर्तीसाठी कार्यादेश देण्यात आले. यानुसार कंपनीतर्फे १५ बसेसचा पुरवठा १५ ऑगस्ट पर्यंत केला जाईल आणि डिसेंबर २०२२ पर्यंत उर्वरित बसेसचा पुरवठा केला जाईल.
मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी यांच्या प्रमुख उपस्थितीत परिवहन व्यस्थापक तथा उपायुक्त रवींद्र भेलावे आणि कंपनीचे उपाध्यक्ष संजय नागपाल यांनी कार्यादेशाच्या प्रतीवर स्वाक्षरी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीना सुद्धा उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिकेतर्फे पर्यावरणपूरक बसेसवर भर देण्यात येत आहे. परिवहन विभागाच्या प्रस्तावानुसार २०२२-२३ पर्यंत १०४.९२ कोटी निधीमधून २३३ मिडी बसेस खरेदी करणे प्रस्तावित असून २०२१-२२ पर्यंत प्राप्त ७७.५२ कोटी मधून पहिल्या टप्प्यात ११५ इलेक्ट्रिक बसेस वेटलिजवर खरेदी करण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात प्राप्त निधीतून अंदाजे १०० इलेक्ट्रिक बसेस खरेदी करणे प्रस्तावित आहे.
हरियाणा येथील पी.एम.आय. कंपनीचे उपाध्यक्ष संजय नागपाल यांनी सांगितले की, चार वर्षांपूर्वी हरियाणामध्ये इलेक्ट्रिक बसेसच्या निर्मितीचा प्लांट उभारण्यात आला असून या प्लांटची क्षमता १५०० बसेसचे उत्पादन करण्याची आहे. चाकण पुणे महाराष्ट्रमध्ये सुद्धा ५०० कोटीची गुंतवणूक करून बसेसचे उत्पादन करण्याचे प्रस्तावित आहे.
कंपनीतर्फे लेह, शिमला, उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात यासह अन्य ठिकाणी बसेसचा पुरवठा करण्यात आला आहे. नागपुरात दाखल होणाऱ्या सर्व इलेक्ट्रिक बसेस वातानुकूलित राहणार आहेत. या बसेसची बैठक क्षमता ३० सीट्सची असून १५ प्रवासी उभे राहू शकतात. यामध्ये एल.एम.ओ. बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. सिंगल चार्जिंगवर १५० किमीपर्यंत बस धावू शकते.






