नागपूर दिनांक 25 मार्च ( शहर प्रतिनिधी)
सिव्हिल लाइन्स येथील शासकीय विज्ञान संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष शिबिराचे उद्घाटन शुक्रवारी महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडले. यावेळी पेंच आणि बोर व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालक श्रीलक्ष्मी अन्नबथुला, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे सहाय्यक वन महानिरीक्षक हेमंत कामडी, विज्ञान संस्थेच्या संचालक डॉ.अंजली राहटगांवकर, रासेयो विभागप्रमुख प्रा.श्रीकांत बोरकर यांची उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्रीलक्ष्मी म्हणाल्या, ‘महाविद्यालयीन काळात स्वत:चे ध्येय निश्चित करणे अत्यंत आवश्यक असते. इतर उपक्रमांमध्ये सहभाग घेतांना शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेत दोन्ही बाबींचा समतोल साधने गरजेचे आहे. असा योग्य समतोल साधल्यावरच या स्पर्धेच्या युगात यश प्राप्त होऊ शकते.’
‘देशभक्ती म्हणजे केवळ क्रिकेटच्या सामन्यात संघाचे समर्थन करणे नव्हे, तर परिसरातील झाडांचे, प्राण्यांचे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे सुद्धा देशभक्ती आहे. सर्व धर्मांमध्ये प्राणिमात्रांवर प्रेम करण्याची शिकवण देण्यात आली आहे, ही शिकवण प्रत्येकाने आत्मसात करावी’ असे मत हेमंत कामडी यांनी मांडले. विविध उपक्रमांचे आयोजन करीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे अंजली राहाटगांवकर यांनी सांगितले.
यावेळी वर्षाभरातील विविध उपक्रमांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. रासेयो स्वयंसेवक पृथ्वी राऊत हिने वर्षभरातील कार्यांचा अहवाल सादर केला. कार्यक्रमाचे संचालन कनिष्का छाब्रा आणि आकृती सोनकुसरे यांनी केले तर आचल राखडे हिने उपस्थितांचे आभार मानले.






