महाराष्ट्र दिनांक 18 मार्च (प्रतिनिधी)
मी राज्यात भाजपचं सरकार पुन्हा येऊ देणार नाही. त्यामुळे घाबरायचं कारण नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजप आणि राष्ट्रवादीतील सामना चांगलाच रंगला आहे.
भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याचा मुद्दा लावून धरण्यात आला आहे. आगामी काळात भाजप या मुद्द्यावरून आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महत्त्वाच्या बैठका पार पडल्या. यापैकी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. परंतु, त्यापूर्वी शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाविकास आघाडीतील युवा आमदारांशीही संवाद साधला. रोहित पवार यांच्यासोबत महाविकासआघाडीतील तरुण फळी सिल्व्हर ओकवर शरद पवार यांच्या भेटीसाठी आली होती.
या भेटीवेळी शरद पवार यांनी महाविकासआघाडीच्या तरुण आमदारांना पूर्णपणे आश्वस्त केले. मी राज्यात पुन्हा भाजपचं सरकार येऊ देणार नाही. त्यामुळे घाबरायचं कारण नाही. पण तुम्ही भाजप नेत्यांकडून कामाचं मार्गदर्शन शिकून घ्या. नियोजनबद्ध व्यूहरचना आखून निवडणूक लढवण्याची तयारी त्यांच्याकडून शिका. ते फायद्याचे आहे. कामाचं मार्केटिंग कसं करायचं हे देखील त्यांच्याकडून शिकलं पाहिजे, असा सल्ला शरद पवार यांनी या तरूण नेत्यांना दिला.






