नागपूर/गडचिरोली, 7 मार्च 2022 (प्रतिनिधी)
मैत्री परिवार संस्थेचा ऐतिहासिक सामूहिक विवाह सोहळा
– गडचिरोली येथे 13 मार्च रोजी भव्य आयोजन
– गडचिरोली जिल्हा पोलिस विभागाचा सक्रीय सहभाग
– उपक्रमाचे चौथे वर्ष
मैत्री परिवार संस्था नागपूर व गडचिरोली पोलीस दल, पोलीस दादालोरा खिडकी यांच्या सहकार्याने गडचिरोली येथे भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे येत्या, 13 मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे. अभिनव लॉन, चंद्रपूर रोड, गडचिरोली येथे सकाळी 10 वाजता होणा-या या विवाह समारोहात 16 आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसह एकुण 117 युवक-युवतींचा विवाह राहणार आहे.
गडचिरोली जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा असून नक्षलवादाने पोखरलेल्या या जिल्ह्यातील नागरिकांना दहशतमुक्त व हिंसामुक्त जीवन जगता यावे, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने नागपूरच्या मैत्री परिवार संस्थेने हा जिल्हा दत्तक घेतला आहे. वर्षभर येथे रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, सामूहिक विवाह सोहळे इत्यादी अनेक उपक्रमांचे आयोजन केले जाते.
मैत्री परिवार संस्थेने पहिल्यांदा नागपुरात 2015 साली सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यात 44 जोडप्यांचा विवाह पार पडला होता. 2018 साली गडचिरोली जिल्हा पोलिस विभागाच्या सहकार्याने गडचिरोली येथे झालेल्या सोहळ्यात 2 आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसह एकुण 105 आदिवासी युवक-युवतींचे विवाह करण्यात आले होते तर 2019 साली अहेरी येथे झालेल्या विवाह समारोहात 5 आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसह एकुण 55 जोडप्यांचे विवाह झाले. कोविडच्या महाप्रकोपामुळे मधल्या काळात विवाह समारोह आयोजनात खंड पडला होता. मैत्री परिवार संस्थेचा हे सामूहिक विवाह सोहळा आयोजनाचे चौथे वर्ष आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन 13 मार्च रोजी पोलीस उप महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र संदीप पाटील यांच्या हस्ते होणार आहे. गडचिरोलीचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक-अभियान सोमय मुंडे, अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे, नागरी कृती शाखेचे प्रभारी सहायक पालीस निरीक्षक महादेव शेलार, आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक गंगाधर ढगे तसेच, सामाजिक कायकर्ते व गुरुदेव सेवा मंडळाचे डॉ. शिवनाथ कुंभारे यांचीही उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहून वधूवरांना आशीर्वाद द्यावा, असे आवाहन मैत्री परिवार संस्था व गडचिरोली पोलीस विभागातर्फे करण्यात आले आहे.
16 आत्मसमर्पित नक्षलवादी तर 8 पालकत्व हिरावलेले
यावर्षी होत असलेल्या या सामूहिक विवाह समारोहात एकुण 117 जोडप्यांचा विवाह होणार आहे. नक्षलवादी चळवळीतून बाहेर पडून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेल्या 16 नक्षलवादी युवक-युवतींचा विवाह हे या समारोहाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. याशिवाय, यात सहभागी झालेल्या 8 मुलामुलींचे मातृपितृ छत्र हरवलेले असून 47 मुलामुलींना एकच पालक आहे.
आदिवासी मुलींना घेतले दत्तक
गरीब आदिवासी कुटुंबातील मुलींचे विवाह करण्यासाठी दानशूर व्यक्तींनी त्यांचे पालकत्व स्वीकारावे, असे आवाहन मैत्री परिवारच्यावतीने करण्यात आले होते. दानदात्यांनी या आवाहनाला उत्तम प्रतिसाद देत आदिवासी मुलींच्या विवाहाचा खर्च उचलला. शिवाय, नवदाम्पत्याचे किमान एक वर्षभर पालनपोषण करण्याची जबाबदारीही स्वीकारली आहे. या मुलामुलींना रोजगार उपलब्ध करून देण्याचाही संस्थेतर्फे प्रयत्न केला जाणार आहे.
सामूहिक विवाह समारोहाची वैशिष्ट्ये
– आदिवासी परंपरेनुसार लावला जाणार विवाह
– नवदाम्पत्याच्या मात्या-पित्यांना भेटवस्तू
– नवदाम्पत्यांसह त्यांच्या 15 नातेवाईकांच्या भोजनाची व्यवस्था
– नववधूला सोन्याचे मंगलसूत्र, चांदीचे जोडवे व संसारोपयोगी साहित्य
– नवदाम्पत्यांशी वर्षभर संपर्कात राहून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न.
यावेळी पोलीस उप महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र संदीप पाटील यांच्यासह मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे, सचिव प्रमोद पेंडके, मैत्री परिवार संस्था गडचिरोलीचे अध्यक्ष निरंजन वासेकर यांची उपस्थिती होती.






