नागपूर, ता. १७ : मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची गंभीर दखल घेत महापौर दयाशंकर तिवारी यांनी तीव्र स्वरूपाच्या खड्ड्यांची प्राथमिकता ठरवीत ते तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने मनपाच्या हॉट मिक्स प्लान्ट विभागाने शहरातील अनेक खड्डे बुजवून नागरिकांना दिलासा दिला आहे.
मोठ्या स्वरूपाच्या खड्ड्याची तीव्रता लक्षात घेऊन व प्राथमिकतेचा निकष ठरवून शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करा, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी गुरुवारी (ता. १६) झालेल्या बैठकीत दिले होते.
निर्देशांचे पालन करीत शुक्रवारी (ता. १७) धरमपेठ झोन क्रमांक २ अंतर्गत रामनगर येथील मार्गावरील १४ खड्डे बुजविण्यात येऊन ९६ स्क्वेअर मीटरचे दुरुस्ती कार्य करण्यात आले .
हनुमान नगर झोन क्रमांक ३ अंतर्गत पिंपळा फाटा मार्गावरील २४ खड्डे बुजविण्यात येऊन २५० स्क्वेअर मीटरचे काम विभागाच्या वतीने करण्यात आले.
मंगळवारी झोन क्रमांक १० अंतर्गत नारा घाट रोड येथील ७५ खड्डे बुजवून २८५ स्क्वेअर मीटरचे कार्य करण्यात आले असल्याची माहिती हॉट मिक्स प्लान्टतर्फे जारी करण्यात आली.






