मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे
राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या माझी जीवनगाथा या पुस्तकातील विचार ट्विट केले आहेत. “जिथे चिकित्सा-स्वातंत्र्य नाही, तिथे बौध्दिक विकास नाही… जिथे बौध्दिक विकासाला बंदी, तिथे राज्यकर्त्यांनी समाज-विकासावर मोठमोठी व्याख्याने देणे, म्हणजे बांडगुळानेच झाडाचं रक्त शोषणं होय!” हे विचार राज ठाकरे यांनी शेअर केले आहेत
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीय द्वेष वाढला, असं वक्तव्य राज यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत केलं होतं.
शरद पवार यांनी राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तकं वाचण्याचा सल्ला दिला होता.
मी प्रबोधनकार आणि यशवंतराव चव्हाण दोघांचीही पुस्तकं वाचली आहेत. पण मी बोलतो त्याचा आजोबांच्या पुस्तकांशी काय संबंध होता हे पवार साहेबांनी मला समजावून सांगावं. त्यांनी सोयीनं प्रबोधनकारांचं नाव घेऊ नये,’ असं राज ठाकरे यांनी म्हटलं होत, राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतरच जातीयवाद वाढल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. ‘देशात हजारो वर्षांपासून जाती आहेत; पण जात हा मुद्दा निवडणूक वेळी समोर येतो. १९९९ पर्यंत केवळ जाती आणि अभिमान होता. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जाती द्वेष वाढला. आधी प्रत्येकाला जातीबद्दल अभिमान वाटायचा, राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर द्वेष सुरू झाला. हे सर्वांना माहितीय. मी केवळ बोललो,’ असं ते म्हणाले






