नागपूरात मातांच्या लसीकरणाला प्राधान्य,जिल्ह्यात राबविणार अभिनव उपक्रम

0
12

* 2 लाख 14 हजार बालकांच्या मातांना लाभ

    * बालविकास प्रकल्प अधिकारी समन्वयक

नागपूर, दि. 9 : कोरोनाची तिसरी संभाव्य लाट येण्याची शक्यता राज्य टास्क फोर्स यांच्याकडून वर्तविण्यात आली असल्यामुळे जिल्ह्यातील शून्य ते तेरा या वयोगटातील बालकांच्या मातांना प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे. तेरा वर्षांपर्यंतच्या वयोगटातील बालके प्रभावित झाल्यास त्यांच्या देखभालीकरिता निश्चितच मदत होणार आहे. जिल्ह्यातील तेरा वर्षे वयोगटातील बालकांच्या मातांची सर्वेक्षण करण्यात आले असून 2 लाख 14 हजार बालकांच्या मातांना प्राधान्याने लस देणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज दिली.

संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली असून यामध्ये बालकांच्या आरोग्याबाबत विशेष दक्षता घेण्याबाबतही राज्य टास्क फोर्सच्या सूचना आहेत. नागपूर जिल्ह्यात पुरुषांबरोबरच महिलांचेही मोठ्या प्रमाणात लसीकरण होत आहे. जिल्ह्यात 8 लाख 8 हजार 919 महिलांचे लसीकरण झाले असल्याची माहिती यावेळी श्री. कुंभेजकर यांनी दिली. जिल्ह्यात आतापर्यंत 18 लाख 41 हजार 904 नागरिकांचे लसीकरण झाले असून यामध्ये 14 लाख 15 हजार 505 नागरिकांनी पहिला डोस तर 4 लाख 26 हजार 399 नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

शून्य ते तेरा वयोगटातील बालकांच्या मातांचे बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रांतर्गत असणाऱ्या पात्र माता-बालकांचे सर्वेक्षण करुन त्यांचे लसीकरण करुन देण्याबाबतची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कोविड-19 अंतर्गत उपलब्ध असलेल्या लसीमधूनच बालकांच्या मातांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे. या लसीकरणातून दैनंदिन स्वतंत्र अहवाल तयार करण्याच्या सूचना संबंधित लसीकरण अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

महिला व बाल कल्याण विभागाच्या सर्वेक्षणामध्ये तेरा वर्षे वयोगटातील मातांची तालुकानिहाय माहिती संकलित करण्यात आली असून त्यानुसार प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात अशा मातांची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार प्राधान्याने लसीकरण करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. नागपूर ग्रामीणमध्ये बोरखेडी व व्याहाड या आरोग्य केंद्रांतर्गत 23 हजार 845 बालकांच्या मातांची नोंदणी करण्यात आली आहे. हिंगणा तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 25 हजार 507 मातांची नोंदणी झाली आहे.

कळमेश्वर तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 13 हजार 658, कामठी तालुक्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत 23 हजार 360, काटोल तालुक्यांतर्गत तीन प्राथमिक केंद्रांतर्गत 12 हजार 183, नरखेड तालुक्यांतर्गत पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 11 हजार 180, कुही तालुकाच्या चार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 12 हजार 238 , भिवापूर तालुक्याच्या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 6 हजार 926, उमरेड तालुक्याच्या चार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 17 हजार 884, मौदा तालुक्याच्या चार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 22 हजार 534, रामटेक तालुक्याच्या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 14 हजार 808, पारशिवनी तालुक्याच्या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 14 हजार 620 तर सावनेर तालुक्याच्या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 15 हजार 868 शून्य ते तेरा वर्षे वयोगटातील बालकांच्या मातांची संख्या आहे. या सर्व बालकांच्या मातांना प्राधान्याने कोविड-19 ची लस देण्यात येणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here