गणेश मंडपातून आतापर्यंत आठ हजारावर बुस्टर डोसचे लसीकरण

0
10

नागपूर दिनांक 6 सप्टेंबर ( शहर प्रतिनिधी)

गणेशोत्सवाच्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील गणेश मंडपांमधून कोव्हिड प्रतिबंधात्मक बुस्टर डोस लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत आठ हजारावर नागरिकांनी बुस्टर डोस घेतला आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून आरोग्य जनजागृती आणि सुरक्षेच्या दृष्टीने लसीकरण मोहिम राबविण्याबाबत मनपा आयुक्त तथा राधाकृष्णन बी. यांनी निर्देशित केले होते.

त्यानुसार आरोग्य विभागाद्वारे शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांच्या मंडपात लसीकरण मोहिम राबविण्यात आली. कोरोनाच्या संभाव्य धोक्यापासून बचाव करण्याच्या दृष्टीने दोन्ही डोस घेतलेल्यांच्या बुस्टर डोस लसीकरणावर भर देण्यात येत आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपातून राबविण्यात येत असलेल्या लसीकरण मोहिमेद्वारे मंगळवारी ६ सप्टेंबर रोजी ५२ गणेश मंडपांमध्ये लसीकरण अभियान राबवून १८२७ जणांना बुस्टर डोस देण्यात आला. आतापर्यंत शहरातील विविध भागातील २९८ गणेश मंडपांमध्ये राबविण्यात आलेल्या लसीकरण अभियानात ८०५६ जणांनी बुस्टर डोस घेतला आहे.

ज्या परिसरातील गणेश मंडपामध्ये लसीकरण मोहिम राबविण्यात येते. तेथील परिसरातील मनपाच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चमूद्वारे लसीकरणाचे कार्य केले जाते.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन्ही डोज घेतलेल्या १२ वर्षावरील पात्र व्यक्तींनी अद्यापही बुस्टर डोस घेतलेला नसल्यास त्यांनी आपल्या जवळच्या गणेश मंडपामध्ये जाउन आपले लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here