नागपूर दिनांक 24 जून ( महानगर प्रतिनिधी)
एका लुटारूंच्या टोळीने उमरेड पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक व कर्मचाऱ्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना मांडवा येथे घडली. उपनिरीक्षक बट्टुलाल पांडे आणि शिपाई प्रदीप चवरे, अशी जखमींची नावे आहेत.दोघांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. (fatal attack on two including a police sub inspector in umred)
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री धुरखेडा येथील कुरिअर कंपनीच्या कार्यालयात चोरी करून चोरट्यांनी साहित्य कंटेनरमध्ये ठेवले. त्यानंतर ते कंटनेर घेऊन ते जात होते. याच दरम्यान पांडे, प्रदीप व अन्य एक मांडवा परिसरात शासकीय वाहनाने गस्त घालत होते. त्यानंतर पुढे या लुटारूंनी कंटेनरमधून एक पोते बाहेर फेकले.
पोते बाहेर फेकल्यानंतर पांडे यांना संशय आला. त्यांनी चालकाला कंटनेर थांबविण्याचा इशारा केला. पांडे यांच्या इशाऱ्याला प्रतिसाद न देता चालकाने कंटेनरचा वेग वाढविला. त्यानंतर एक कर्मचारी पोत्याजवळ गेला. तर. पांडे व प्रदीप हे कारने कंटनेरचा पाठलाग करायला लागले.
आपला पाठलाग होत असल्याचे लक्षात आल्यानंतर लुटारूंनी कंटनेर थांबविले. याचवेळी पोलिसांचेही वाहन मागून येत होते. कंटनेर चालकाला पोलिसांचे वाहन दिसले. त्याने कंटनेर रिव्हर्स घेत पोलिसांच्या वाहनाला धडक दिली.
यानंतर कंटनेरमधून सात ते आठ जण खाली उतरले. त्यांनी रॉडने पांडे व प्रदीप यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले. या हल्ल्यानंतर लुटारू कंटनेर घेऊन पसार झाले. पांडे यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला या सर्व घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच उमरेड पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले.






