एकनाथ शिंदेंसह ४० आमदार गुवाहाटीत दाखल,बच्चू कडूही……

0
16

महाराष्ट्र दिनांक 22 जून ( प्रतिनिधी)

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर गेल्या काही तासांपासून सुरु झालेल्या राजकीय नाट्यातील रंगत अद्यापही कमी झालेली नाही. एकनाथ शिंदे हे काल सकाळपासून आपल्या समर्थक आमदारांसह सूरतमधील ली मेरेडियन हॉटेलमध्ये थांबले होते. मात्र, बुधवारी पहाटे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत असलेल्या आमदारांच्या गटाला सूरतहून गुवाहाटीला नेण्यात आले.

काहीवेळापूर्वीच हे सगळे गुवाहाटी विमानतळावर उतरले आहेत. यावेळी विमानतळावर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात होता. विमानतळावर उतरल्यानंतर या सगळ्यांना बसमध्ये बसवून मुक्कामाच्या दिशेने पाठवण्यात आले. शिवसेनेच्या सर्व आमदारांना गुवाहाटीच्या हॉटेल रॅडिसनमध्ये ठेवण्यात आले आहे. या हॉटेलमध्येही तगडा सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना आणि महाविकास आघाडी हादरली आहे. कालपर्यंत शिवसेनेकडू पक्षाचे बहुतांश आमदार आमच्यासोबतच राहतील, असे सांगितले जात होते.

मात्र, आज सकाळी एकनाथ शिंदे हे ४० आमदारांना घेऊन गुवाहाटीत पोहोचले आहेत ,यामध्ये राज्यमंत्री बच्चू कडू यांचाही समावेश आहे.

या आमदारांसोबत एकनाथ शिंदे वेगळा गट स्थापन करून विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावावेळी निर्णायक भूमिका बजावू शकतात. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळण्याची शक्यता आता कैकपटीने वाढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here