माझी वसुंधरा अभियानातील उत्कृष्ट कार्य नागपूरच्या जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांचा मुंबईत सत्कार

0
17

नागपूर दिनांक 5 जून ( प्रतिनिधी)

पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत नागपूर जिल्हा व नागपूर महानगर क्षेत्रामध्ये झालेल्या उल्लेखनीय कार्यासाठी नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला व नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांचा आज मुंबईत सत्कार करण्यात आला.

वातावरणीय बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने विविध उपायोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून समृद्ध पर्यावरण निर्माण करण्यासाठी ‘माझी वसुंधरा अभियान 2.0’ हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यात येत आहे.

याअंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक संस्था, विभागीय व जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांचा सन्मान जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड, सदस्य सचिव अशोक शिनगारे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आर. विमला, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, उमरेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश खवले यांचा विशेष प्रमाणपत्र देऊन आज सत्कार करण्यात आला. यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी व त्यांची टीम देखील उपस्थित होती.

वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन, नैसर्गिक संसाधनांचा कमीत कमी ऱ्हास, त्याचे संरक्षण, हरित पट्ट्यामध्ये वाढ, वातावरणीय बदल, पर्यावरण संवर्धन व संरक्षण, थोडक्यात भूमी (जमीन), जल (पाणी), वायू (हवा), अग्नी (ऊर्जा), आकाश (संवर्धन) यांचा संरक्षणाचा समावेश या अभियानात आहे. त्यातून राज्याच्या शाश्वत विकासाप्रती प्रयत्न करणे, पर्यावरणाच्या समस्यांबद्दल जागरूक करणे, असे उद्देश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here