नागपूर दिनांक 3 एप्रिल (महानगर प्रतिनिधी)
३३ खेळ, ३९ मैदाने, ४० हजार खेळाडू, ९३ लाखांचे रोख पुरस्कार
आपले नागपूर शहर क्रीडा राजधानी व्हावी यासाठी खासदार क्रीडा महोत्सव मोठे व्यासपीठ ठरत आहे. आपल्या नागपूर शहरात प्रा. विजय बारसे, भाउ काणे आणि अशा अनेक ज्येष्ठ क्रीडा संघटकांनी असंख्य खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. आपल्या शहरातील खेळाडू पुढे यावेत, त्यांनी देशात, जगात नावलौकीक करावे यासाठी खासदार क्रीडा महोत्सव त्यांच्यासाठी महत्वाची संधी ठरत आहे.
या खेळाडूंच्या विकासासाठी आणि शहरात खेळाचे वातावरण वाढीस लावण्यासाठी आपसातील मतभेद विसरून क्रीडा संघटनांनी पुढे यावे व खासदार क्रीडा महोत्सवाला पुढे नेण्यास आपले योगदान द्यावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व क्रीडा संघटक ‘झुंड’ चित्रपटाचे प्रेरक विजय बारसे यांच्या प्रमुख उपस्थितीत चवथ्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखांची घोषणा, महोत्सवाच्या संकेतस्थळाचे विमोचन आणि क्रीडा संघटकांना ध्वज वितरण करण्यात आले.
मंचावर खासदार डॉ. विकास महात्मे, माजी ऊर्जा मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, आमदार विकास कुंभारे, आमदार नागो गाणार, खासदार क्रीडा महोत्सव समितीचे मुख्य संयोजक माजी महापौर संदीप जोशी, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी आमदार सुधाकर देशमुख, माजी आमदार अशोक मानकर, गौरीशंकर पराशर उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विजय बारसे व उपस्थित मान्यवरांनी रिमोटची कळ दाबून १३ मे २८ मे २०२२ या खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखांची घोषणा केली.
याशिवाय खासदार क्रीडा महोत्सवाच्या www.khasdarkridamahotsav.com या संकेतस्थळाचेही नितीन गडकरी यांनी विमोचन केले. यावेळी विजय बारसे यांच्या हस्ते विजेत्यांना देण्यात येणा-या आकर्षक चषकाचे विमोचन करण्यात आले.
पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले, कोव्हिडमुळे आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या काळात आजच्या मुलांना मोबाईलचे अतिशय वेड लागले. या मुलांच्या हातातून मोबाईल सुटावा यासाठी त्यांना मैदानावर आणणे आवश्यक आहे, त्यांच्या खेळाची गोडी निर्माण होणे आवश्यक आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि चंद्रशेखर बावनकुळे ऊर्जा मंत्री असताना त्यांच्या नेतृत्वात शहरातील जवळपास २०० मैदानांचा विकास करण्यात आला. मात्र ही मैदाने पुरेशी नाहित शहरातील किमान ३५० मैदाने उत्तम असावीत यासाठी प्रयत्न करीत असून त्यासाठी क्रीडा संघटना आणि क्रीडा संघटकांनी पुढे येण्याची गरज असल्याचेही नितीन गडकरी म्हणाले.
स्थानिक आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य यांनीही त्यांच्या भागातील मैदानांचा विकास करून ते खेळाडूंना खेळण्यासाठी उपलब्ध करून द्यावे. मैदानांसाठी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी नि:शुल्करित्या देण्यात येउन खेळाडूंना सकाळ-संध्याकाळ मैदानांवर खेळता यावे यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे.
मैदान असलेल्या भागातील खेळासाठी समर्पित क्रीडा संघटना, क्लब यांना ही मैदाने संचालन आणि व्यवस्थापनासाठी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दीनानाथ हायस्कूल पुढील जिमखाना मैदानावर लहानपणी क्रिकेट खेळल्याची आठवण यावेळी नितीन गडकरी यांनी सांगितली. आज या मैदानाची स्थिती वाईट असून शहरातील मैदाने वाचविण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून १३ ते २८ मे दरम्यान १६ दिवस ४० हजार खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळणार आहे. त्यांच्यासाठी ९३ लक्ष रुपयांचे रोख पुरस्कार आहेत. मात्र खेळाडूंना मैदानावर आणणे, त्यांना योग्य प्रशिक्षण देणे यासाठी क्रीडा संघटना आणि संघटकांची भूमिका महत्वाची आहे. संघटनेत वाद असल्यास ते एकमताने सोडवा आणि खेळासाठी एकत्र या, अशी सादही गडकरी यांनी दिली. खेळाडूंचे प्रोत्साहन वाढविण्यासाठी नागरिकांनीही आपल्या जवळच्या मैदानात जाउन त्यांच्यातील कलागुणांना दाद द्यावी, असे सांगतानाच त्यांनी उन्हाळा असल्याने सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात स्पर्धा घेण्याची सूचना देखील केली.
खेळाडूंसाठी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी सुविधा : संदीप जोशी
यंदाच्या खासदार क्रीडा महोत्सवात खेळाडूंना ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमातून नोंदणी करता येणार आहे. पुढील वर्षीपासून सर्व नोंदणी या ऑनलाईन माध्यमातूनच होतील, अशी माहिती खासदार क्रीडा महोत्सवाचे मुख्य संयोजक माजी महापौर संदीप जोशी यांनी प्रास्ताविकात दिली.
ते पुढे म्हणाले, खासदार क्रीडा महोत्सवाच्या चवथ्या वर्षीच्या स्पर्धा येत्या १३ मे रोजी सुरू होत असून ही संपूर्ण क्रीडा प्रेमींसाठी आनंदाची बाब आहे. खासदार क्रीडा महोत्सवाने आता व्यापक स्वरूप धारण केले असून नागपूरचा क्रीडा महोत्सव आता इतर शहरांसाठी आदर्श ठरत आहे. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील क्रीडा महोत्सव नुकताच भंडारा-गोंदिया जिल्ह्यात आयोजित करण्यात आले. आता ते वर्धा येथेही घेण्यात येणार आहे. खासदार क्रीडा महोत्सवाने क्रीडा क्षेत्र आणि खेळाडूंसाठी नवा आदर्श निर्माण केला असून त्याची वाढणारी व्याप्ती ही खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी महत्वाची ठरणार आहे, असेही ते म्हणाले.
यंदाच्या खासदार क्रीडा महोत्सवात १६ दिवस (१३ ते २८ मे) ३४ खेळांच्या स्पर्धा एकाचवेळी ३९ मैदानांवर चालतील. यामध्ये एकूण ९२३७ सामने खेळविण्यात येणार असून ५६० चषक, ७८३० पदक देण्यात येणार असून या क्रीडा महोत्सवाच्या रणसंग्रामात तब्बल ४० हजार खेळाडूंचा सहभाग असणार आहे. विजेत्यांना ९३ लक्ष रुपयांचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचेही संदीप जोशी यांनी सांगितले.
खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी आयोजित या महोत्सवादरम्यान कोणत्याही संघटनेचे कसलेही वाद हे खेळ आणि खेळाडू दोघांसाठीही मारक असून ते सर्व बाजूला सारुन महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी क्रीडा संघटना आणि संघटकांना केले.
कार्यक्रमाचे संचालनआरजे राजन यांनी केले. पीयूष आंबुलकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खासदार क्रीडा महोत्सव समितीचे नागेश सहारे, डॉ. पद्माकर चारमोडे, डॉ. संभाजी भोसले, डॉ. विवेक अवसरे, सचिन देशमुख, अशफाक शेख, अमित संपत, सतीश वडे, सचिन माथाने, सुनील मानेकर, लक्ष्मीकांत क्रिपाने, आशिष मुकीम, प्रकाश चंद्रायण आदींनी सहकार्य केले.






