तारांगण प्रकल्प विद्यार्थी व संशोधकांना मोठी उपलब्धी ठरणार :जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ

0
10

यवतमाळ दि. 27 फेब्रुवारी, (प्रतिनिधी) :

यवतमाळ नगरपरिषदेतर्फे सुरू करण्यात आलेला तारांगण प्रकल्प हा युवा वर्ग, विद्यार्थी, अभ्यासक व संशोधक यांचेसाठी मोठी उपलब्धी आहे. अंतराळात घडणाऱ्या घडामोडीबाबत जाणून घेण्याची अनेकांच्या मनातील जिज्ञासा या प्रकल्पातून पुर्ण होईल. तारांगण प्रकल्प हा यवतमाळच्या नावलौकीकात भर घालणारा उपक्रम ठरेल असे मत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी व्यक्त केले.

नाविण्यपुर्ण योजने अंतर्गत शहराच्या मध्यभागी नेहरू उद्यान परिसरामध्ये उभारण्यात आलेले नेहरू तारांगण आजपासून सुरू करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, नगरपालीकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक माधुरी मडावी, उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी, तहसिलदार कुणाल झाल्टे, नगरपालीकेचे अभियंता विनय देशमुख, डॉ. विजय अग्रवाल, यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

तारांगण हा कल्पकतेने बनवलेला चांगला उपक्रम नगरपरिषदेने सुरू केला असून आपल्या मुलांना तारांगणमधील ब्रम्हांडाची माहिती दाखवावी तसेच पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांनी तारांगणला आवश्य भेट द्यावी असे आवाहन अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी यावेळी केले.

तारांगणमधून अंतराळ बाबतची शास्त्रीय माहिती तसेच अंतराळात घडणाऱ्या विविध घटनांची माहिती अत्याधुनिक यंत्रासामुग्रीद्वारे दाखविण्यात येईल व दर्शकांना प्रत्यक्ष अंतराळ गेल्याचा आनंद प्राप्त होणार आहे. नगरपालीकेच्या या उपक्रमाचा सर्वांना लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी यावेळी केले.

तारांगणच्या पहिल्या शो प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. क्रांती कुमार, पत्रकार, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी तसेच गणमान्य नागरिक उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here