राज्याचे विधिमंडळ हिवाळी अधिवेशन हे नागपूरला होणार असल्याची चर्चा होती. पण ठाकरे सरकारनं हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचं निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे
तसेच विधिमंडळ हिवाळी अधिवेशन येत्या 22 ते 28 डिसेंबरला मुंबईत करण्याचं राज्य सरकारचं नियोजन असून, सोमवारी संसदीय कामकाज समितीची बैठक होणार आहे, त्यातच या तारखांवर अधिकृत शिक्कामोर्तब होणार असल्याचं बोललं जातंय.
कोरोनाची येऊ घातलेली संभाव्य तिसरी लाट, विधान परिषद निवडणूक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेली शस्त्रक्रिया या तीन कारणास्तव राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन लांबणीवर पडल्याचं सांगितलं जात होतं. दरम्यान आता 22 ते 28 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार असल्याची माहिती मिळालीय.
हिवाळी अधिवेशन हे प्रथा आणि परंपरेनुसार दरवर्षी नागपूरला होतं, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर झालेल्या शस्त्रक्रियेच्या कारणास्तव ते मुंबईत घेण्याचे नियोजन आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीलाही अधिवेशन मुंबईत हवे आहे, पण भाजप हिवाळी अधिवेशन नागपुरात व्हावे यासाठी प्रयत्नशील आहे.
आरटीपीसीआर टेस्ट करणे अनिवार्य
तसेच दोन्ही डोस घेतल्यानंतरही या अधिवेशनादरम्यान प्रत्येकाला पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट करणे अनिवार्य असेल. त्यामुळे विधिमंडळ सदस्य, त्यांचे स्वीय सहायक, सर्व अधिकारी-कर्मचारी, वृत्तसंकलनासाठी येणारे माध्यम प्रतिनिधी, सुरक्षेसाठी तैनात असणारे पोलीस, राज्यभरातून येणारे वाहन चालक या सर्वांच्या आरटीपीसीआर टेस्ट अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याची महत्त्वपूर्ण सूचना विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी आरोग्य विभागाला केली होती.






