नागपूर, २१ ऑक्टोबर: कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने नागपूरसह राज्यातील अन्य शहरात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. या प्रक्रियेच्या अंमलबजावणीमुळे व्यावसायिक प्रतिष्ठान, शाळा, महाविद्यालय आणि इतर संस्था देखील पूर्ववत सुरु झाल्या आहेत किंवा होण्याच्या प्रक्रियेत आहे. यामुळे शिक्षण किंवा इतर कामांकरिता घराबाहेर पडणाऱ्यांची संखय देखील वाढली आहे. या वाढलेल्या प्रवाशांची संख्या लक्षात घेत महा मेट्रो नागपूरने मेट्रो गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे.
या वाढीव फेऱ्यांप्रमाणे उद्या दिनांक २२ ऑक्टोबर (शुक्रवार) पासून ऑरेंज लाईन (कस्तुरचंद पार्क स्टेशन ते खापरी मेट्रो स्टेशन) वरील प्रवासी सेवा सकाळी ७.१० वाजेपासून उपलब्ध असेल. दिवसाची पहिली फेरी ७.१० वाजता झाल्याने आता या मार्गिकेवरील शाळा, महाविद्यालय, तसेच इतर संस्थांमध्ये सकाळच्या पाळीत कार्यरत असलेल्या विद्यार्थी किंवा इतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एकीकडे पहिली फेरी ७.१० वाजता करताना महा मेट्रोने शेवटच्या फेरीत देखल वाढ केली असून आता उद्यापासून या मार्गिकेवर शेवटची फेरी रात्रौ ९ वाजता असेल.
ऑरेंज मार्गिके सोबत एक्वा मार्गिकेवर (सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन) देखील प्रवासी सेवा सकाळी ६.३० वाजे पासून रात्रौ ९ वाजे पर्यंत असेल. दोन्हीही मार्गिकांवर प्रवासी सेवा दर १५ मिनिटाने उपलब्ध असेल.
एकीकडे अनलॉक प्रक्रियेमुळे शैक्षणिक संस्था सुरु होण्याच्या तयारीत असताना, दुसरीकडे व्यावसायिक प्रतिष्ठानच्या वेळेत वाढ झाली आहे. रोषणाईचा उत्सव दिवाळी काही दिवसांवर आला असताना, हा सण साजरा करताना खरेदी करण्याकरता मोठ्या प्रमाणात नागपूरकर घराबाहेर पडत आहेत.
दिवाळीच्या खरेदी करता घराबाहेर पडणाऱ्या नागपूरकरांकरता मेट्रोने फेऱ्यांमध्ये होणारी हि वाढ एक प्रकारे पर्वणीच म्हणावी लागेल. कारण आता संध्याकाळी दिवाळीची खरेदी झाल्यावर घरी परतण्याकरता मेट्रो नागपूरकरांच्या सेवेत असणार आहे.






