अन्न व औषध प्रशासन विभागाची हॉटेल असोशिएनसोबत बैठक
नागपूर दि. 1 : सणासुदीच्या दिवसात गोड पदार्थाची मागणी वाढते. मिठाई तयार करतांना त्यावर वापरण्याची तारीख म्हणजे बेस्ट बिफोर तारीख टाकणे अनिवार्य आहे, तरी विक्रेत्यांनी त्याचे पालन करावे, असे आवाहन सहआयुक्त अन्न आ. सु. महाजन यांनी केले आहे.
नुकतीच अन्न व औषध प्रशासनाने शहरातील हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. सध्या सुरू असलेल्या सणासुदीच्या दिवसात जनतेला निर्भेळ अन्न पदार्थ मिळण्याबाबत व स्वच्छता राखण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
सणासुदीच्या दिवसात अन्न पदार्थाची मागणी जास्त होत असल्यामुळे मिठाई व फरसाण, खोवा ईत्यादी अन्न पदार्थ दर्जाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. त्यामध्ये त्यांनी मिठाई, फरसाण तयार करतांना स्वच्छतेची काळजी घ्यावी, तसेच वापरण्यात येणारे पदार्थ दर्जेदार असावे व ते परवाना नोंदणीधारक व्यावसायिकांकडुनच खरेदी करावे. तसेच अन्न पदार्थ तयार करतांना खाद्यतेलाचा वारंवार पुनर्वापर टाळावा. खाद्यरंग प्रमाणात वापरावेत.
खुल्या मिठाईच्या ट्रेवर वापरण्याची तारीख टाकावी. तसेच हॉटेलमध्ये अन्न पदार्थ हाताळणाऱ्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करावी व त्यांना फोस्टॅक ट्रेनिंग द्यावी, असे आपल्या संघटनेच्या सदस्यांना पत्रक काढुन अवगत करावे व त्यांच्याकडून दिलेल्या सुचनांचे पालन करून घ्यावे. तसेच शहराच्या ईट राईट स्मार्ट सिटी व ईट राईट चॅलेंज या अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण व केंद्र शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेऊन शहराला ईट राईट स्मार्ट सिटी बनविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन श्री. मोहिते यांनी केले.
नागपूर ऑनर्स हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष भवानीशंकर दवे यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी दिले. या बैठकीस कार्यालयातील सर्व अन्न सुरक्षा अधिकारी व नागपूर ओनर्स हॉटेल असोसिएशचे अध्यक्ष भवानीशंकर दवे, सचिव नारायण राठी तसेच इतर पदाधिकारी आत्माराम वजीरानी, अरुण रुईया, पुरुषोत्तम जोशी, गिरीश जोशी, राहुल मोहता, अजय जोशी, विजय मारोटिया उपस्थित होते.






