आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत पथविक्रेत्यांना मिळणार लाभ

0
8

 

नागपूर, ता.२२ : केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत मनपाच्या समाजविकास विभागामार्फत शहरातील पथविक्रेत्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यात येत आहे. लॉकडाउनमध्ये झालेल्या नुकसानामुळे पुन:श्च व्यवसाय करण्याकरिता १० हजार रुपये भांडवल कर्ज म्हणून उपलब्ध करून देण्यात आले आहे. या निधीमधून ज्या पथविक्रेत्यांचे खाद्यपदार्थ बनविण्याचे व्यवसाय सुरु आहे, अशा पथ विक्रेत्यांच्या व्यवसायांना गती प्राप्त व्हावी या उद्देशाने केंद्र शासनाने ऑनलाईन फूड डिलिव्हरी सेवा सुरू करण्याबाबत स्वीगी या फूड डिलिव्हरी कंपनीसोबत करार केला आहे. त्याअंतर्गत शहरातील खाद्य पदार्थांची विक्री करणा-या पथविक्रेत्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासंदर्भात मनपाद्वारे कार्यवाही करण्यात येत आहे.

नागपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये १९०० पथ विक्रेत्यांचे खाद्यपदार्थ बनविण्याचे व्यवसाय करीत असल्याबाबतची माहिती समाजविकास विभागाकडे प्राप्त आहे. सदर योजनेशी संलग्नित करण्याकरिता स्वीगी या कंपनीमार्फत नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील पथविक्रेत्यांकरिता कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर कर्मचा-यांमार्फत ज्या ठिकाणी पथविक्रेते व्यवसाय करीत आहे, त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना योजनेबाबत माहिती प्रदान केली जाईल. स्वीगी वर बेसिक ऑनबोर्डींग करणे, मेन्यू डिजिटलायजेशन आणि कॅटलॉगिंग, पॅन रजिस्ट्रेशन, अन्न व पुरवठा विभागाचा परवाना सदर सर्व प्रक्रिया करण्यात येणार आहे. यासाठी एकूण ७०७ रुपये खर्च येत असून त्यापैकी ६०७ रुपये केंद्र शासनामार्फत अदा करण्यात येणार आहे व उर्वरित १०० रुपये खर्चाचा भार पथ विक्रेत्यांना ग्रहण करावयाचा आहे.

सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता पथ विक्रेत्यांनी ९०१५५००८०० या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून तसेच झोन निहाय समाजकल्याण विभागाला व मुख्य कार्यालयाशी संपर्क साधून योजनेचा लाभ घेण्याबाबत मनपाचे समाजविकास उपायुक्त राजेश भगत यांनी आवाहन केले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here