नागपूर 2 आक्टोबर (प्रतिनिधि) – ज्येष्ठ नागरिकांना माहूर गडावर देवी दर्शनाला जाणे सोयीचे व्हावे म्हणून लवकरच तेथे रोपवे बाधणार, अशी घोषणा केन्दीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. त्याच प्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी शेगाव आणि माहूर दर्शनासाठी ई-बसच्या सहली नियमित स्वरूपात आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना निमित्त ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान तर्फे आयोजित ज्येष्ठांच्या मेळाव्यात ना. नितीन गडकरी बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दत्ता मेघे उपस्थित होते. प्रतिष्ठान तर्फे चालविण्यात येत असलेल्या ग्रीन बस द्वारे आतापर्यंत पंधरा हजार ज्येष्ठ नागरिक सहलीला जाऊन आले ही आनंदाची बाब होय, असे सांगून ना. गडकरी पुढे म्हणाले की ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी साठी ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान सोबत शहरातील अधिकाधिक ज्येष्ठ नागरिक मंडळांनी संलग्न होऊन एक व्यापक संस्था उभी केली पाहिजे.
ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांच्या आरोग्य तपासण्या नियमीत होत राहाने आवश्यक आहे, असे प्रतिपादन करून ना. गडकरी पुढे म्हणाले की त्याकरिता एम्स आणि शालिनीताई मेघे रूग्णालयांशी टायअप करून प्रतिष्ठान तर्फे ज्येष्ठांना आरोग्य कार्ड आम्ही तयार करून देऊ. ज्या मुळे ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासण्या नियमित आणि निःशुल्क होऊ शकतील.
खासदार महोत्सवात केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कार्यक्रम घेणार
या वर्षी पासून खासदार महोत्सवात ज्येष्ठ नागरिकांकरिता वेगळे आणि स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करण्यात येतील अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे. हे कार्यक्रम केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी राहतील आणि सर्व कार्यक्रम दिवसाचे वेळी सुरेश भट सभागृहात होतील, असे ही ना. गडकरी पुढे म्हणाले.
या प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात दत्ता मेघे म्हणाले की, समस्या सोडवून घेण्यासाठी, ना. नितीनजी च्या नेतृत्वाखाली नागपूरातील सर्व ज्येष्ठ नागरिक मंडळांनी एकत्र येणे काळाची गरज आहे.
या वेळी आदासा येथील मातोश्री वृध्दाश्रम, पंचवटी वृध्दाश्रम, ज्ञानज्योती अंध विद्यालय, विमलाश्रम आणि साई आश्रम या पाच संस्थांना मेघे साहेबांतर्फे आर्थिक मदत ना. गडकरींच्या हस्ते प्रदान करण्यात आली. तसेच जी मंडळं ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानसोबत संलग्न झालित त्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गिरीश गांधी, प्रा. अनिल सोले, अशोक मानकर, नंदाताई जिचकार, नुतन रेवतकर,बाबुराव तिडके, बबनराव वानखेडे यांनी ही आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे संचालन प्रतिष्ठानचे सचिव डॉ राजू मिश्रा यांनी, प्रास्ताविक बाळ कुळकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन ट्रस्टी मेहमूद अंसारी यांनी केले. यावेळी प्रतिष्ठानचे सर्व ट्रस्टी प्रतापसिंह चव्हाण, प्रभाकर येवले, निलेश खांडेकर, कमलेश राठी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
.






