नागपूर दिनांक 23 सप्टेंबर ( प्रतिनिधी)
आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही आरोग्य विमा योजना असून केंद्र शासन व राज्य शासनाद्वारे राबविण्यात येते. महाराष्ट्र राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना संयुक्तपणे राबविण्यात येतात.
या योजनांचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. यासोबतच आरोग्य विभागाने योजनेंतर्गत कार्ड वाटप करुन जास्तीत जास्त लाभ नागरिकांना देण्यात यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
आयुष्मान भारत दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या स्व. आबासाहेब खेडकर सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले,त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे होत्या तर उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती सुमित्रा कुंभारे, महिला व बाल कल्याण सभापती उज्वला बोढारे, शिक्षण व अर्थ सभापती भारती पाटील, समाजकल्याण सभापती नेमावली माटे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपूल जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, कार्यकारी अभियंता सुभाष गणोरकर, शिक्षणाधिकारी श्रीमती कुंभारे, आयुष्मान भारतचे विभागीय व्यवस्थापक कादरी व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे व्यवस्थापक बोराडे यावेळी उपस्थित होते.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी ना सी.एस.सी केंद्रामार्फत गोल्डन ई-कार्ड वाटप प्रक्रिया सुरु असून लाभार्थी आधार कार्ड, राशन कार्ड किंवा प्रधानमंत्री यांच्या स्वाक्षरीचे पत्र जोडून या योजनेचा लाभ मिळवू शकता. आतापर्यत 3 लक्ष 42 हजार 837 ई-कार्डचे काढण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबांना प्रतीवर्ष प्रती कुटुंब 5 लक्षापर्यंत विमा संरक्षण देण्यात आलला आहे. तसेच 1 हजार 209 व 183 पाठपुरावा सेवांचा समावेश करण्यात आला असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले.
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य ही महाराष्ट्र शासनाची योजना असून यात केसरी, पिवळे तथा अंत्योदय आणि अन्नपूर्णा राशन कार्ड धारक पात्र लाभार्थी असून प्रती कुटुंब प्रती वर्ष 1 लक्ष 50 हजार पर्यंत आरोग्य विमा संरक्षण देण्यात येते. या योजनेंतर्गत 34 विशेषज्ञ सेवांतर्गत उपचार व शस्त्रक्रिया व 121 पाठपुरावा सेवा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
एकत्रित जनआरोग्य योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील खाजगी 31 व 9 शासकीय रुग्णालये असे एकूण 40 रुग्णालयात सेवा देण्यात येत असून या संयुक्त योजनेंतर्गत आतापर्यंत 45 हजार 377 रुग्णांना लाभ देण्यात आला असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी सांगितले.






