महाराष्ट्र दिनांक 26 मई ( प्रतिनिधी)
देशात आलेली कोरोनाची (Corona) तिसरी लाट आता जवळपास संपल्यात जमा आहे. मात्र, असं असलं तरीही चौथ्या लाटेचा धोका अद्यापही कायम आहे. त्यातच राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना (corona Patents) रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं बघायला मिळालं. त्यामुळे राज्यातील जनतेने मास्क (Mask) वापरत रहावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून नागरिकांना केले. (Corona Virus In Maharastra Latest News)
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाला होता. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट होताना दिसून येत होती. परंतु, मुंबईमध्ये दिवसागणिक जवळपास 200 रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाची चौथी लाट येईल अशी शक्यता आरोग्यतज्ञांनी वर्तवली आहे.
सध्या राज्यातील कोरोना संक्रमित रुग्णांचा साप्ताहिक दर 1.59 टक्के इतका असून असून मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त रुग्ण पॉझिटीव्ह आढळून येत आहेत.
मागील काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत 52.79 टक्के वाढ झाली आहे. मुंबईपाठोपाठ ठाण्यामध्ये 27.92 टक्के तर रायगड आणि पालघर जिल्ह्यात 18.52 टक्के 68.75 टक्के इतकी वाढ झाली आहे. सध्या राज्यात फक्त एक रुग्ण व्हेटिलेटरवर असून 18 रुग्ण ऑक्सिजनवर आहे.






